विठुरायाच्या नामस्मरणात बसरापूरकर झाले दंग
भोर प्रतिनिधी - कुंदन झांजले
आषाढी एकादशी निमित्त गावात रंगला विठ्ठल रखुमाईचा पालखी वारी दिंडी सोहळा.
भोर तालुक्यातील शहरापासून नजीक असणाऱ्या बसरापूर येथे जानकादेवी भजनी मंडळाने गावात अनोखा उपक्रम राबवित आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाई पालखी वारी दिंडी सोहळा गुरुवार (दि२९ ) गावात ग्राम प्रदक्षिणा घालत साजरा केला.
हरिनामाच्या गजरात, विठुरायाच्या नामस्मरणात, टाळ मृदंगाच्या तालावर भगव्या पताका घेत पावसाच्या रिमझिम धारेत गावातील सर्व नागरिकांनी वारीचा आनंद लुटला. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा राया माझा,माझा तुकोबा राया , विठोबा रखुमाई,जय जय रामकृष्ण हरी, अशा जय घोषात हि वारी दिंडी भक्तीमय वातावरणात पार पडली.यावेळी गावातील भजनी मंडळाचे कार्यकर्ते, आजी माजी सरपंच, उपसरपंच,पो पाटील , तंटामुक्ती अध्यक्ष, पदाधिकारी, तरूण तरूणी, लहान मुले व विशेष करून महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. वारकरी सांप्रदायिक वारसा पुढील येणाऱ्या पिढीला माहित व्हावा, संतांचे आचार विचार सर्व स्तरातून रुजावेत, मोबाईलच्या या युगात युवा वर्गाला वारीचा संतमहिमा कळावा हा यामागील हेतू आहे असे या गावचे सामाजिक कार्यकर्ते जानकादेवी भजनी मंडळाचे कार्यकर्ते चंद्रकांत झांजले यांनी यावेळी सांगितले.
Post a Comment