News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

बंगाल वॉरियर्स संघातबारामतीच्या दोन खेळाडूंची निवड

बंगाल वॉरियर्स संघातबारामतीच्या दोन खेळाडूंची निवड


 ९ लाख ६३ हजारांची लागली बोली;
प्रो कबड्डी लीग स्पर्धा २ डिसेंबर पासून सुरु

बारामती: प्रतिनिधी  
बारामती येथील दोन राष्ट्रीय कबड्डीपटूंची प्रो कबड्डी लीग पर्व १० साठी बंगाल संघातून निवड झाली आहे. या स्पर्धांचे लिलाव ९ ऑक्टोबरला पार पडले. दोन्ही खेळाडूंसाठी ९ लाख ६३ हजारांची बोली लागली होती. या दोन्ही खेळाडूंचा करार दोन वर्षासाठी झाला आहे. दोन डिसेंबरपासून प्रो कबड्डी लीगच्या स्पर्धा सुरू होणार आहेत. त्यामुळे बारामती येथे कबड्डी या खेळाकडे युवकांचा कल वाढू लागला आहे.

 दीपक शिंदे व श्रेयस उमरदंड अशी या दोन खेळाडूंची नावे आहेत. बिटरगाव (ता. करमाळा जिल्हा सोलापूर ) येथील मूळ रहिवासी असणारा दीपक शिंदे ( वय १९) हा कुटुंबाचा विरोध पत्करून केवळ कबड्डीसाठी मागील आठ वर्षांपासून बारामती मध्ये राहत आहे. येथील बारामती स्पोर्ट अकॅडमी मध्ये प्रशिक्षक दादा आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तो जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी कबड्डीचा सराव करत आहे. कबड्डी खेळायला सुरुवात केल्यापासून दीपकने अवघ्या चार वर्षातच राज्याच्या वरिष्ठ संघामध्ये स्थान मिळवले होते. पाच वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर दीपक याची बंगालच्या संघामध्ये डिफेंडर म्हणून निवड झाली आहे. तत्पूर्वी कबड्डी या खेळाच्या वेडापायी दीपक यांच्या कुटुंबाकडून त्याला मोठा विरोध झाला. दीपक याचे एकत्र कुटुंब आहे. त्याने पोलीस भरती व्हावे अशी कुटुंबाची अपेक्षा होती. करिअर होऊ शकते याचा अंदाज कुटुंबाला नसल्यामुळे हा विरोध होत आहे असे दीपकला वाटते. एकदा का मी या खेळामध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवले तर आपोआप त्यांचा विरोध मावळेल असेही दीपक म्हणतो. प्रो कबड्डी लीग साठी आता बंगाल संघात निवड झाल्यानंतर दीपकच्या वडिलांनी त्याला पूर्णपणे खेळाकडे लक्ष दे असे सांगितले आहे. त्यामुळे कुटुंबाचा विरोध असला तरी वडिलांच्या पाठिंब्यामुळे मी जिद्दीने या स्पर्धेसाठी उतरणार आहे असे दीपक याने सांगितले. तर श्रेयस उमरदंड (वय २०) याची देखील बंगाल संघामध्ये लेफ्ट कव्हर डिपेंडर म्हणून निवड झाली आहे. श्रेयस याच्या वडिलांचे बारामती येथील जुनी भाजी मंडई परिसरात किराणा मालाचे दुकान आहे. तो सध्या शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये बीए च्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. सहा वर्षापासून खेळणाऱ्या श्रेयसने १७ वया खालील तसेच २० वयाखालील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्र संघाकडून प्रतिनिधित्व केले आहे. श्रेयश याला आई-वडिलांकडून कबड्डी खेळासाठी पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे एक मोठा कबड्डीपटू म्हणून ओळख निर्माण करणार असल्याचे श्रेयस याने सांगितले. दरम्यान, श्रेयस व दीपक यांचे प्रशिक्षक दादा आव्हाड यांची देखील भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन आयोजित गोवा येथे होणाऱ्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाच्या प्रशिक्षक पदी निवड झाली आहे.
-----------------------------------------------चौकट : 
 बारामती येथून आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारे खेळाडू तयार व्हावेत. असा आमचा उद्देश आहे. दीपक व श्रेयस ने घेतलेल्या मेहनतीचे त्यांना फळ मिळाले आहे. आज अनेक खेळाडू कबड्डी खेळाकडे आकर्षित होत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. भविष्यात इतर खेळांप्रमाणे कबड्डीचे देखील व्यावसायिक खेळाडू तयार होतील.
- दादा आव्हाड
 प्रशिक्षक 
-------------------------------------------
 फोटो ओळी : कबड्डीपटू दीपक शिंदे व श्रेयस उमरदंड प्रशिक्षक दादा आव्हाड यांच्यासह.
-------------------------------------------

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment